News

‘गावात आपल्या जीविताला धोका झाल्यास स्वतःजबाबदार’ मराठा समाजाचा नेत्यांना इशारा

हिंगोली, 19  सप्टेंबर : मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाज आक्रमक झाला आहे. हिंगोलीतील ग्रामीण भागात गावात न येण्याचा राजकीय पुढार्‍यांनी आता गावात आल्यास जीविताला धोका होण्याचा इशाराच दिला आहे.

राज्यातील मराठा आरक्षणावर स्थगिती मिळाल्यानंतर, मराठा समाजामध्ये आक्रोश व्यक्त केला जात आहे. त्यामुळे केवळ मराठा समाजाचा हा मतदानासाठी वापर का, असा प्रश्न तरुणांकडून विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये, आता राजकीय पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली असून गावाच्या बाहेरच बोर्ड लावून, गावात न येण्याचा इशारा, राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना देण्यात आला.

“चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष”, “आता मराठा आरक्षण ऐवढेच आमचं लक्ष” अशा आशयाचे फलक, हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांच्या बाहेर दिसू लागले आहेत. असाच एक बोर्ड औंढा तालुक्यात असलेल्या टाकळगव्हाण, या गावच्या लोकांनी गावाबाहेर लावला असून, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना, गावात येण्यास बंदी घातली आहे.

प्रामुख्याने शेती व्यवसाय करणाऱ्या मराठा समाज, मागील अनेक वर्षांपासून नुकसानीत शेतीचा व्यवसाय करत आहे. परंतु, त्यांच्या या समस्येकडे कोणीही पाहायला तयार नाही.  त्यात शैक्षणिक दृष्ट्या ही आता हळूहळू समाज मागास होऊ लागला आहे.  या अडचणी  मुळे मागील अनेक वर्षांपासून,आरक्षणाची मागणी केली जात आहे. परंतु, कोणत्याही राजकीय पक्षाने, मराठा समाजासाठी काहीच केलं नाही. अशी भावना समाजाच्या युवकांकडून, बोलून दाखवली जाऊ लागली आहे.

त्यामुळेच मराठा समाज आता अधिक आक्रमक झाला असून, पुढाऱ्यांना गावात येणे पासूनच मज्जाव केला जावू लागला आहे. सोबतच गावात आल्यास, “आपल्या जीविताला धोका झाल्यास, स्वतः जबाबदार” असल्याचा इशाराही मराठा समाजाला दिला आहे.