News

मला विखेंच्या सल्ल्याची गरज आहे, पण… हसन मुश्रीफ यांची तुफान टोलेबाजी

प्रतिनिधी – राधाकृष्ण विखे पाटील यांना मी १४ ऑगस्टला झालेल्या बैठकीला बोलावले होते. पण ते आले नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत व मी ज्युनियर आहे, म्हणून ते आले नसावेत. पण मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे,’ असे वक्तव्य करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ‘मी आधीच सांगितलं होतं की महिन्यातून किमान एकदा नगरला जिंदा किंवा मुडदा येईनच. गेल्या आठ महिन्यात मी १४ वेळा नगरला आलोय, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

नगरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मात्र १५ ऑगस्टनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नव्हते. त्यावरून त्यांच्यावर माजी मंत्री राधाकृष्ण यांनी नगरला बोलताना टीका केली होती. सरकारमध्ये काम करणारे सत्ताधारी पक्षातील लोकांचा पब्लिसिटी इव्हेंट चालू आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तर नेमकी कशाची काळजीय ? त्यांचा तर सगळा वेळ ग्रामपंचायतवर मागच्या दाराने प्रशासक म्हणून आपले बगलबच्चे नेमण्याचा प्रयत्नात गेला,’ अशी टीका विखे यांनी केली होती. या टीकेचा आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात करोना अनुषंगाने आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आशुतोष काळे, महापौर बाबासाहेब वाकळेआदी उपस्थित होते.

‘जिल्ह्यात होणाऱ्या सगळ्या मीटिंगला सर्व मंत्र्यांना बोलावले जात नाही. ज्या मिटींगला त्यांना बोलावले जाते, त्याला ते येतातच,’ असे सांगत मुश्रीफ म्हणाले, ‘१४ ऑगस्टला मी जी बैठक घेतली त्याला सर्व लोकप्रतिनिधींना बोलवले होते. त्या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी आले, पण राधाकृष्ण विखे आले नाहीत. कदाचित ते ज्येष्ठ नेते व मी ज्युनियर म्हणून ते आले नसावेत. पण मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे,’ असे सांगतानाच पालकमंत्र्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात किती वेळा दौरा केला याची माहिती दिली.

ते म्हणाले, ‘२० जानेवारीला पालकमंत्री म्हणून माझी निवड झाली. खरंतर माझी निवड सहा जानेवारीला झाली होती. पण बाळासाहेब थोरात कोल्हापूरला व मी येथे अशी पालकमंत्री म्हणून आमची निवड करण्यात आली. मात्र थोरात कोल्हापूरचा चार्ज घेत नव्हते, म्हणून मी इकडचा चार्ज घेत नव्हतो. अखेर २० तारखेला मी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर आजपर्यंत तब्बल चौदा वेळा माझी नगरला भेट झाली आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्याला काम करायचे आहे. त्यासाठी आपण चांगल्या निधीची तरतूद केली होती. पण दुर्दैवाने करोना आला. नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. नगर मला सुंदर करायचे आहे. ते माझं स्वप्न करोनाच्या परिस्थितीतून बाहेर पडल्यावर नक्की पूर्ण करू,’ असेही त्यांनी सांगितले.