गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का नाही?; या मंत्र्याचा सवाल
जळगाव: सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी लावून धरणाऱ्या भारतीय जनता पक्षानं भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का केली नाही,’ असा रोकडा सवाल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
अजिंठा शासकीय विश्रामगृहावर ते सोमवारी पत्रकारांशी बोलत होते. ‘खरंतर राष्ट्रपतींसारख्या महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्तीचा कार्यक्रम मिनिट टू मिनिट दाखवला जातो. मात्र, आता माध्यमे सुशांतसिंह राजपूत आणि कंगना यांच्या बातम्या मिनिट टू मिनिट दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतसिंह राजपूतनं काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? तो दारू, सिगारेट पिणारा नट होता. त्याच्या बाबतीत साऱ्या गोष्टीचा उलगडा झाला आहे,’ असं पाटील म्हणाले.
‘भारत-चीन सीमेवर तणाव असताना टीव्हीवर चीनची बातमी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना त्याची कधी सीआयडी चौकशीची मागणी भाजपने केली नाही. गोपीनाथ मुंडेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही, असंही पाटील म्हणाले. ‘बिहारमध्ये राजपूत समाजाची मतं हवी असल्यानंच भाजपकडून हे राजकारण सुरू आहे. टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरू आहे,’ असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.