मुख्यमंत्र्यांवर टीका; त्रिपुरात पत्रकाराला बेदम मारहाण
वृत्तसंस्था, गुवाहाटी – त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्यावर टीका केल्यानंतर पराशर बिस्वास या पत्रकाराला शनिवारी बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात बिस्वास गंभीर जखमी झाले असून, ते आगरतळा येथे रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्रिपुरामधील भाजप सरकारने करोना साथीच्या काळात परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही, अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. त्यावर याला आपण ‘क्षमा करणार नाही,’ असे म्हणत देव यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांवर टीका केली होती.
यानंतर त्रिपुरा येथील बंगाली दैनिकाचे पत्रकार पराशर बिस्वास यांनी एका व्हिडीओमधून मुख्यमंत्र्यांवर आक्रमक शब्दांत टीका केली होती. बिस्वास करोनासंसर्गामधून नुकतेच बरे झाले आहेत. ते शुक्रवारी करोना केंद्रात उपचार घेत असताना, संबंधित व्हिडीओ चित्रित केला. या व्हिडीओमध्ये ते अत्यंत आक्रमक पद्धतीने बोलताना दिसतात. ही पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर काही वापरकर्ते मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अयोग्य पद्धतीने केल्याबद्दल बिस्वास यांच्यावर टीका करताना दिसतात.
बिस्वास यांना शनिवारी करोना केंद्रातून घरी सोडल्यानंतर धालाई जिल्ह्यात अंबासा येथे घरात घुसून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस उप महासंचालक राजीव सिंग यांनी सांगितले. बिस्वास काम करत असलेल्या स्यांदन पत्रिका या वर्तमानपत्राचे संपादक सुबल डे यांनी सांगितले की ‘मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना धमकी दिल्यानंतर एका दिवसात आणि बिस्वास यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर १२ तासांत त्यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला भाजप सदस्यांनी घडवून आणला असावा, असा आमचा संशय आहे.’
भाजपने मात्र, हे आरोप फेटाळले आहेत. ‘ आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. आमचा कोणताही पक्षसदस्य या हल्ल्यात सहभागी नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात कोणी पक्षाचा कार्यकर्ता आढळला, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईलच,’ असे त्रिपुरा भाजपचे प्रवक्ते नबेंदू भट्टाचारजी यांनी सांगितले.
केंद्र सरकारने त्रिपुरामध्ये राज्य सरकारच्या मदतीसाठी पथक पाठवले होते. त्यावेळी ईशान्य भारतात सर्वाधिक मृत्युदर त्रिपुरात असल्याचे आढळले होते. त्यानंतर मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्यावर करोना साथीचे व्यवस्थापन योग्यरित्या न केल्याबद्दल माध्यमांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर शुक्रवारी सब्रूम येथे एसईझेडच्या उद्घाटनप्रसंगी देव यांनी माध्यमांवर ताशेरे ओढले होते.