बीड

भुजबळ झाले होम क्वॉरंटाइन

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भुजबळ स्वत: होम क्वॉरंटाइन झाले असून त्यांचे कार्यालय एक आठवडा बंद राहणार आहे.

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना करोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ६ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास करोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.

दरम्यान, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी सकाळी स्पष्ट झाले. ताप आणि अंगदुखीची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी गुरुवारी स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला. कदम यांना त्यांच्या पुण्यातील घरात क्वारंटाइन झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देऊन संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी कदम यांच्या कुटुंबातील आमदार मोहनराव कदम यांच्यासह चौघांना करोनाची लागण झाली होती.

दरम्यान, महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या गुरुवारी १० लाखांच्या उंबरठ्यावर होती. काल हा आकडा १० लाखांचा टप्पा ओलांडून १० लाख १५ हजार ६८१ इतका झाला. आतापर्यंत राज्यात घेण्यात आलेल्या एकूण ५० लाख ७२ हजार ५२१ चाचण्यांमधून २० टक्के चाचण्यांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. काल एकाच दिवशी राज्यात तब्बल २४ हजार ८८६ इतक्या नवीन रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. काल १४ हजार ३०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत ७ लाख १५ हजार २३ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ७०.४ टक्के इतके आहे.

कालच्या आकडेवारीनुसार राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ७० हजारपार गेला आहे. ७२ हजार ८३५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. पुण्यातील अन्य आकडेही चिंता वाढवणारे आहेत. पुण्यातील एकूण रुग्णसंख्या काल २ लाख २३ हजार ७१० इतकी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४६ हजार १८२ रुग्ण बरे झाले असून ४६९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील करोना बाधितांचे आकडेही वाढतेच आहेत. ठाण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २८ हजार ६८८ इतकी झाली आहे.