बीड

कंगना भेटीनंतर आठवलेंचे ‘हे’ मोठे विधान

मुंबई: ‘मुंबईत कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. मुंबई जशी शिवसेनेची आहे तशी ती भाजप, रिपाइं, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांची आणि सर्व भाषिकांचीही आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत राहण्याचा सर्वांनाच अधिकार आहे’, असे आपण अभिनेत्री कंगना राणावतला सांगितल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नमूद केले. ( Ramdas Athawale Meets Kangana Ranaut )

कंगना विरुद्ध शिवसेना वाद विकोपाला गेला आहे. त्यातच बुधवारी मुंबई महापालिकेने कंगनाच्या प्रशस्त कार्यालयावर बुलडोझर चालवल्याने आगीत तेल ओतले गेले आहे. मनालीतून कंगना मुंबईत परतत असतानाच या कारवाईचा मुहूर्त पालिकेच्या अतिक्रमण विभागाने साधला. त्यावर कंगनाने तीव्र संताप व्यक्त केलाच शिवाय कोर्टातही धाव घेतली आहे. कोर्टाच्या आदेशाने तूर्त ही कारवाई थांबवण्यात आली असताना आज रामदास आठवले यांनी कंगनाची भेट घेऊन त्यांचा पक्ष तिच्यासोबत असल्याचे सांगितले.

एक तासाच्या भेटीनंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना, मुंबई पालिका व कंगनाशी पंगा घेणारे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ‘कंगनाशी माझं विस्तृत बोलणं झालं. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख तिने रागाच्या भरात केला होता, असे बोलण्यातून स्पष्ट झाले. ती केलेल्या एकेरी उल्लेखाचे मी समर्थन करत नाही. मात्र कंगनाच्या कार्यालयावर जी कारवाई करण्यात आली ती सूड घेण्याच्या इराद्यानेच झाल्याचे स्पष्टच दिसत आहे. मुंबई पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे आणि राज्यातही शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे कंगनाने काही चुकीचं केलं होतं तर ती मुंबईत आल्यावर रितसर नोटीस तिच्या हाती देऊन कारवाई करायला हवी होती. आता कारवाईला स्थगिती दिली असली तरी पालिकेने दोन चार इंच अतिक्रमणापलिकडेही बरेच अधिकृत बांधकाम तोडले आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टाळू शकले असते. मात्र त्यांनी ते केले नाही. त्यामुळे या सर्वाला सरकारचा पाठिंबा होता, असा संशय घ्यायला वाव आहे, असे आठवले म्हणाले.

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये कंगनावर ड्रग्जबाबत आरोप करण्यात आले आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय हे आरोप करण्यात आले आहेत. त्यासाठी सामना आणि या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आठवले यांनी केली. कंगनाने सुशांत प्रकरणात जे दावे केले आहेत त्यात तथ्य आहे. सुशांतसिंह राजपूतची हत्याच झाली आहे. सीबीआयने याप्रकरणी वेगाने तपास करावा व प्रकरणाचा छडा लावावा, असा आग्रह आठवले यांनी धरला.

> कंगना गेल्या १६ वर्षापासून मुंबईत राहते आहे. मी आता मराठी शिकणार आहे व मी मराठी बोलले तर ते शिवसेनेला आवडेल, असं तिने मला सांगितल्याचंही आठवले म्हणाले.

> कंगना आरपीआयमध्ये आली तर तिचं शंभर टक्के स्वागत करेन आणि भाजपात गेली तर ५० टक्के स्वागत करेन, असं आपल्या खास शैलीत आठवले म्हणाले. मात्र राजकारणात रस नसल्याचे कंगनाने सांगितल्याचे आठवलेंनी पुढे नमूद केले.

> पत्रकारांशी बोलताना सुरुवातीला आठवले यांच्या तोंडून चुकीचा उल्लेख झाला. कंगना राणावत बोलण्याऐवजी ते कंगना रावण बोलले. मग लगेचच त्यांनी या चुकीची दुरुस्ती केली.