आमच्यासाठी कंगना एपिसोड संपला; शिवसेना बॅकफूटवर ?
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत सोबत सुरू असलेल्या वादाला आज अखेर शिवसेनेने पूर्ण विराम दिला आहे. आमच्यासाठी कंगना एपिसोड संपला आहे. आमच्याकडे आणखीही कामं आहेत, असं शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कंगनाप्रकरणावरून चौफेर टीका होऊ लागल्याने शिवसेना बॅकफूटवर आल्याचं बोललं जात आहे.
खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना हा वाद संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. कंगनाप्रकरण आम्ही विसरून गेलो आहोत. आमच्यासाठी हा वाद संपुष्टात आला आहे. आम्ही आमच्या दैनिक सरकारी आणि सामाजिक कामात मग्न झालो आहोत, असं राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याशी काय चर्चा करण्यात आली? असा सवाल केला असता पक्षाशी संबंधित कामांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, असं ते म्हणाले.
कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचं सांगतानाच या केवळ अफवा असल्याचंच त्यांनी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्यात बैठक होण्याआगोदर मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात बैठक झालयाचं सूत्रांनी सांगितलं. कंगना राणावत प्रकरणात शिवसेना प्रतिक्रिया देणार नसल्याचं पवार-ठाकरे यांच्या चर्चेत शिवसेनेने मान्य केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळेच राऊत यांनी या प्रकरणाला शिवसेनेकडून पूर्णविराम दिल्याची चर्चा आहे.