बीड

१५ दिवसांत तुकाराम मुंढे यांची बदली रद्द

मुंबई: कडक शिस्तीचे अधिकारी अशी ख्याती असलेले व अनेक कारणांनी नेहमी चर्चेत राहणारे तुकाराम मुंढे यांची बदली राज्य सरकारने रद्द केली आहे. केवळ १५ दिवसांतच तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात आला असून यामागे नेमकं काय घडलं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. ( IAS Tukaram Mundhe ‘s Transfer Canceled )

नागपूर महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. २६ ऑगस्ट रोजी या बदलीचे आदेश निघाले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी ही बदली करण्यात आली होती. मात्र, अवघ्या १५ दिवसांतच अचानक आज मुंढे यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात आल्याने सारेच अवाक् झाले आहेत. पोलीस दलांतील भरत्यांमध्ये झालेल्या गोंधळाप्रमाणेच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गोंधळही यामुळे अधोरेखित झाला आहे.

तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करताना आता मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मुंबई) सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.

दरम्यान, नागपूर पालिका आयुक्तपदावरून मुंढे यांची बदली झाल्यानंतर या पदाचा कार्यभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तुकाराम मुंढे यांची नागपूर पालिका आयुक्त म्हणून कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली. नागपूरचे महापौर व सत्ताधारी नगरसेवक यांच्यात अनेक मुद्द्यांवरून उभा वाद रंगल्याचेही पाहायला मिळाले. शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या मुंढे यांनी नागपुरातही कामाचा धडाका लावला. नागपुरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. सत्ताधारी पक्षाचा विरोध असतानाही त्यांनी निर्बंधांच्या बाबतीत कठोरपणा दाखवला. त्याचा परिपाक म्हणून नागपुरात बराच काळ करोनाची स्थिती नियंत्रणात होती. गेल्या काही दिवसांपासून मात्र रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. नागपूरमध्ये करोनाविरुद्ध लढात देत असताना मुंढे यांनाही करोनाने गाठले. मुंडे यांनी आता करोनावर यशस्वी मात केली असून करोनामुक्त होताच त्यांना बदली रद्द झाल्याची बातमी मिळाली आहे.

नागरिकांनी केले कौतुक

करोनातून मुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बुधवारीच त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘तपस्या’ येथे नागपूरकर नागरिकांची भेट घेतली. यावेळी नागपूरकरांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. आजही मुंढे नागरिकांशी भेटून संवाद साधत आहेत.करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंढे यांच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या. १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर मुंढे यांनी संवादासाठी उपलब्ध असल्याचे एका संदेशाद्वारे कळविले होते. त्यानुसार बुधवारी काही नागरिक आयुक्तांचे शासकीय निवासस्थान असलेल्या जवाहर विद्यार्थीगृहाच्या शेजारील ‘तपस्या’ या निवासस्थानी त्यांना भेटले. मुंढे यांच्या कामाचे नागरिकांनी कौतुक केले. त्यांनी करोना काळात केलेल्या कामांचा उल्लेख अनेकांनी केला. तसेच मनपात लावलेली शिस्त, घेतलेले कठोर निर्णय यांबद्दलही त्यांचे अभिनंदन केले. एका महिलेने मुंढे यांच्या हाताला धागाही बांधला. एका लहान मुलीनेही ‘मुंढे यांच्या कार्याची प्रेरणा आम्हाला मिळाली’, असे सांगितले.

आज करण्यात आलेल्या अन्य नियुक्त्या :

> एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

> ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.