बीड

तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डींचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

हैदराबाद, 08 सप्टेंबर : अभिनय क्षेत्रासाठी 2020 हे वर्ष अत्यंत दु:खदायक ठरत आहे. यावर्षी अनेक दिग्गज आपण गमावले आहेत. दरम्यान सिनेसृष्टीला धक्का देणारी आणखी एक घटना मंगळवारी घडली आहे. प्रसिद्ध तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी (Jayaprakash Reddy) यांचे आंध्र प्रदेशातील गुंतूर याठिकाणी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने जयप्रकाश यांचे निधन झाले ते 74 वर्षांचे होते.

जयप्रकाश यांच्या जाण्याने तेलुगू सिनेसृष्टीसह सर्वांसाठीच हा मोठा धक्का होता. त्यांचा एक चाहतावर्ग आहे. कॉमेडी भूमिकांमध्ये त्यांचा हातखंडा आहे त्याचप्रमाणे खलनायकाच्या भूमिकेतही ते अनेकांच्या पसंतीस उतरले होते. त्यांनी त्यांच्या अभिनय करिअरची सुरूवात ब्रह्मपुत्रडू या सिनेमातून केली होती. प्रेमिंचू कुंदन रा, गब्बर सिंह, चेन्नाकेशव रेड्डी, टेम्पर यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी देखील जयप्रकाश रेड्डी यांच्या अचानक जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करून असे लिहिले आहे की, ‘जयप्रकाश रेड्डी गारा यांच्या जाण्याने तेलुगू सिनेमा आणि थिएटरने आज एक हिरा गमावला आहे. त्यांना विविध ढंगी परफॉरमन्सने गेल्या काही दशकात आम्हाला सर्वांना काही आठवणीतील सिनेमॅटिक क्षण दिले आहेत. मी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहे.’