बीड

…तर 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत लोकल, शाळा, कार्यालये सुरू होऊ शकतात; TIFRचा अहवाल

मुंबई, 6 सप्टेंबर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडॉऊन होता. आता टप्प्या टप्प्यानं देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाला आहे.

लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल करण्यात आले असले तरी मुंबईसह राज्यात शाळा-महाविद्यालये अद्याप बंद आहे. अनेक शासकीय-खासगी कार्यालये बंद आहेत. विशेष म्हणजे मुंबईची लाईफलाईन थांबली आहे. त्यामुळे अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होक करण्यास सांगितलं आहे. मात्र तरी देखील आधीसारखं सुरळीत कधी होणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. यावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अर्थात TIFRनं एक अहवाल तयार केला आहे. TIFR नं आपला अहवाल मुंबई महापालिकेकडे सादर केला आहे.

मुंबईतील सर्व कार्यालये आणि सर्व लोकल गाड्या 1 नोव्हेंबरपर्यंत टप्प्या टप्प्यानं धावतील. तर शाळा-महाविद्यालये जानेवारी-2021 पर्यंत सुरू होऊ शकतात, असं या अहवालात म्हटलं आहे. TIFRचा अहवाल गणितीय दृष्टीकोनावर आधारित आहे.

स्कूल ऑफ टेक्नोलॉजी आणि कॉम्प्यूटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. हर्ड इम्युनिटीनुसार, 75 टक्के झोपडपट्टीत आणि 50 टक्के इतर भागात राहणाऱ्या लोकांमध्ये डिसेंबर किंवा जानेवारी 2021 पर्यंत अँटीबॉडीज निर्माण होतील.

काय म्हटलं आहे TIFRच्या अहवालात?

TIFRच्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये मुंबईतील अनलॉक 30 टक्क्यांपर्यंत वाढवायला हवं. यात शासकीय आणि खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. ऑक्टोबरपर्यंत 50 टक्के गोष्टी सुरळीत व्हायला हव्यात तर 1 नोव्हेंबरपर्यंत शहरातील सर्व व्यवहार सुरळीत करावेत. मात्र, असं करताना सार्वजनिक वाहतुकीत सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे, हात स्वच्छ करणे त्याचबरोबर कार्यालये, रेल्वे गाड्या, बसेस निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

मात्र, या अहवाला कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याचा उल्लेख नाही.