एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा डागली तोफ
जळगाव, 5 सप्टेंबर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ खडसे यांनी तोफ देखील डागली आहे.
देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करू शकत नाही. कारण मुहुर्त साधत लग्न करून शपथ घेत तीन चार दिवस संसार करत ते मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाले होते. तीन-चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर पतिव्रता आहोत, असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण आता नैतिकता घालवल्या गेली आहे, अशा परखड शब्दांत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस एकटेच लढत असून महाराष्ट्रभर फिरत आहे. पूर्वी आमचं टीम वर्क होतं. त्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर नितीन गडकरी यांच्या तोफ चालयचा तर अलीकडे माझासह पंकजा मुंडे, गिरीश बापट, विनोद तावडे, हरिभाऊ बागडे असा आमचा एकत्र ताफा होता. त्यामुळे सरकार घाबरून गांगारून जायचं. मात्र, आता महाराष्ट्रातली सर्व नेते मंडळी शांत बसलेली आहेत. जनतेनं निवडून दिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते अधून मधून बोलतात. मात्र जी आक्रमक भाषा पाहिजे, ती त्यांच्या कुठेच दिसत नाही. आम्ही कमी पडत आहोत, असं मतही एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडून द्या…
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला होता. महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडून द्या, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या संध्येला स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले होते. महाआघाडी सरकारमध्ये एक-दीड वर्षात उलथापालथ होईल, असं वाटतं नसल्याचंही खडसे यांनी सांगितलं होतं. महाविकास आघाडी सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे, त्यामुळे राज्यातील सरकार पडेल, ही आशा करणं सोडावी, असा सल्ला खडसेंनी स्वपक्षीय नेत्यांना दिला होता.
देवेंद्र फडवीसांनी टोला?
तसेच 10-15 वर्षांपूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. राज्यात मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’ हे जनतेला आवडलं की नाही. याचा आता मी शोध घेणार, असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता एकनाथ खडसे यांनी टोला लगावला होता.
भाजपला बसला आयरामांचा फटका
राज्यात भाजप-शिवसेना युती नसताना 123 भाजप आमदार निवडून आणले. मात्र, युती झाल्यावर 107 कसे झाले? असा सवाल यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. पक्षात आलेल्या आयरामांचा फटका बसला आहे. मी पून्हा येईन, मी पुन्हा येईल… हे लोकांना आवडले नाही का? भाजपकडे सगळं असताना पराभव झालाच कसा? असा सवाल करत मला अनेक पक्षांची ऑफर असल्याची गौप्यस्फोट खडसेंनी यावेळी केला. मात्र, आपण भाजप सोडणार नाही. कारण पक्ष आम्ही उभा केला, असं देखील खडसेंनी सांगितलं होतं.
खडसे म्हणाले की, एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी अथक परिश्रम घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकुल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे, असा टोलाही खडसेंना स्वपक्षीयांना लगावला आहे.
भावना आणि संतापाचा कधी स्फोट होऊ शकतो…
एकनाथ खडसे म्हणाले, ‘मी गेली40 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. मात्र, पक्षानं माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांचा कधी स्फोट होईल, हे मी सांगू शकत नाही, भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचं संकट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितल आहे.