राजकारण

आता ‘जनता कर्फ्यू’ कशाला? बारामतीकरांच्या विरोधामुळे अजित पवारांना धक्का

बारामती, 05 सप्टेंबर : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर सरकारकडून काम सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. पण, बारामतीकरांनी या जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला आहे.

बारामती नगरपालिका प्रशासनाकडून 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या 14 दिवसांच्या कालावधीसाठी “जनता कर्फ्यू” लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अनेक लोकांच्या बंद बाबतीत मागणी स्वरुपाच्या सूचना आल्यामुळे हा बंद घेण्यात आल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. वास्तविक पाहता या निर्णयासाठी अधिकारी वर्गाने सर्व प्रकारच्या व्यापारी वर्गाचे आणि नागरिकांचे मत घेणे अपेक्षित होते.

‘कोरोना रुग्णांची संख्या व परिस्थिती गंभीर असल्यामुळे प्रशासनास हा निर्णय घेणे जरूरीचे वाटत असले तरी, व्यापारी आणि प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांबरोबर चर्चा होणे गरजेचे होते. कोरोना इतकीच गंभीर परिस्थिती व्यापारी आणि सामान्य नागरिक यांची आर्थिक बाबतीत झालेली आहे’ असं म्हणत बारामती मर्चेन्ट्स असोसिएशनने जनता कर्फ्यूच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

‘मागील लॉकडाउननंतर आता कुठे परिस्थिती थोड़ी सावरत असताना पुन्हा हा “संपूर्णतः” स्वरुपाचा लॉकडाउन होऊ घातला आहे. शेतकरी वर्गाचे खरीप हंगामाचे पिक बाजारात येऊ घातले आहे. मुग,बाजरी,मका ही पिके निघालेली असून रोजच पावसाचे सावट असताना ती विकण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध नसेल तर शेतकरी वार्गाची मोठी कुचंबना होणार आहे. केंद्र सरकारने मागे जाहिर केलेल्या लॉकड़ाउनमध्ये सुद्धा मार्केट यार्डवरील व्यवहार चालू ठेवण्यास परवानगी होती. जी या वेळी बंद मध्ये देण्यात आलेली नाही. यावर चर्चा होणे गरजेचे वाटते आहे. MIDC च्या व्यापारी वर्गाबरोबर ज्या प्रकारे प्रशासनाने चर्चा करून मार्ग काढला आहे, अश्या प्रकारची चर्चा व्हावी’, अशी मागणीही बारामती मर्चेन्ट्स असोसिएशनने केली आहे.

लॉकडाउनला आमचा विरोध नसून काही बाबतीत चर्चा करून आमच्या आणि शेतकरी वर्गाची अडचण अधिकारी वर्गाने जाणून घ्याव्यात असंही या असोसिएशनने म्हटलं आहे.