असं पहिल्यांदाच घडलं असावं! पर्यटकांना रोखण्यासाठी मुळा धरण परिसरात १४४ कलम लागू
अहमदनगर: मुळा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे याभागात आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्यामुळे प्रशासनाने या भागात कलम १४४ लागू करीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. त्यामुळे आता मुळा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना वगळता इतरांना याभागात जाण्यास निर्बंध असणार आहेत.
नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून मुळा धरण ओळखले जाते. २६ हजार दशलक्ष घनफुट क्षमता असणाऱ्या या धरणातील पाणीसाठा २५ हजार ५०० दशलक्ष घनफुट झाल्यानंतर मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले, व त्याद्वारे धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे जायकवाडी धरणाला जाऊन मिळते. मुळा धरणातून पाणी सोडल्यानंतर हे दृश्य पाहण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यातच जिल्ह्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मात्र, मुळा धरणाच्या परिसरात येणारे बहुतांश पर्यटक हे तोंडाला मास्क लावत नाहीत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. धरणाच्या परिसरात होणाऱ्या या पर्यटकांच्या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी अनिल पवार यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करीत धरणाच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
हा आदेश मुळा धरणाच्या वरील बाजूस पाचशे मीटरपर्यंत व धरणाच्या भिंतीच्या खालील बाजुस पाचशे मीटरपर्यंत लागू असणार आहे. याभागात आदेशानुसार ३० सप्टेंबरपर्यंत संचार करणे, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे यासाठी बंदी असणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामासाठी व्यक्तींच्या हालचालीवर व फिरण्यावर बंदी असणार आहे. आदेशामधून मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच या विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना सूट देण्यात आली आहे.