Newsराजकारण

राऊतांचं राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

मुंबई: राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यांना सगळं बंद करण्याची हौस नाहीये, असा पलटवार करतानाच थोडा संयम ठेवा, अन्यथा परिस्थितीबाहेर जाईल, अशी भीती शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली. तसेच केंद्र सरकारप्रमाणे करोना ही देवाची करणी आहे, असं मानायला राज्य सरकार तयार नसल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला.

(‘महाराष्ट्रातच देऊळ बंद का?’ राज ठाकरेंनी पत्र लिहून CM उद्धव ठाकरेंना विचारला सवाल)

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिर सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. राज्यातील जनतेचे आरोग्य आणि जीवित लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. सगळं काही बंद राहावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा नाही. उलट मंदिर सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची मनापासून इच्छा आहे. मुख्यमंत्री त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

देशासह राज्यातील करोनाचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रात १५ हजाराच्यावर लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे विरोधाकांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे. लोकशाहीत सर्वच विरोधकांना मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा अधिकार आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.