बीड

उद्धव ठाकरे सर्वाधिक काळ घरात राहणारे पहिलेच मुख्यमंत्री; भाजपची खोचक टीका

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरातून बाहेर न पडल्याने राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. राज्यात करोनाचं महासंकट असतानाही ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर पडले नाहीत. जनतेचा आक्रोशही त्यांच्या कानी गेला नाही, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत. सरकारचा प्रमुख म्हणून काम करत असताना अशाप्रकारे घरात बसून राज्य कारभार चालिवता येत नाही, यामुळे आता जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे व उद्रेक झाला आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

एवढे महिने राज्य सांभाळूनही राज्यात तर सोडाच, मुख्यमंत्री मंत्रालयात सुद्धा यायला तयार नाहीत. मागे कोविड संदर्भात मंत्रालयात बैठक झाली, आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

पत्रकार रायकर यांचा आज मृत्यू झाला. मग काय झाले तुमच्या आरोग्य यंत्रणेचे? मुख्यमंत्री पुण्याला गेले, कोविड सेंटर सुरू केले. मोठमोठ्या घोषणा करून आलात. पण साधी एक रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आज त्या पत्रकाराला नाहक आपला जीव गमवावा लागला. राज्यात कधी नव्हे इतका विस्कळीतपणा या सरकारच्या काळात आला आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. एका बाजूला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असो, आपण स्वतः विविध प्रश्नांवर राज्यात वणवण फिरत आहोत, अगदी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा काही ठिकाणी जाऊन आले. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडायला वेळ नाही आणि हे राज्याच्या हिताचे नाही, असेही ते म्हणाले.