News

शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या; इंदूरमध्ये खळबळ

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शिवसेना नेते आणि ढाब्याचे मालक असलेल्या रमेश साहू यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

इंदूरच्या तेजाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरीखेडा येथे ढाब्याचे मालक आणि शिवसेना नेते रमेश साहू यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आज, बुधवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबाबत पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. साहू हे शिवसेनेचे मध्य प्रदेशातील प्रमुख होते. ढाब्यावरच त्यांची हत्या करण्यात आली. सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली.

ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी सर्वात आधी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमकी कोणत्या कारणातून हत्या झाली हे तपासानंतरच समोर येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

घटनास्थळाजवळ लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. ढाब्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात आहे. साहू यांचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.