देश विदेश

ट्रम्प समर्थक आणि वर्णद्वेष विरोधी आंदोलकांमध्ये राडा; एकाचा मृत्यू

पोर्टलँड: पोर्टलँडमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ च्या नावाखाली एकत्र आलेल्या वर्णद्वेष विरोधी आंदोलकांमध्ये राडा झाला. या दोन्ही गटांच्या निर्दशकांमध्ये झालेल्या गोळीबारात एका निर्दशकाचा मृत्यू झाला. मात्र, ही गोळी कोणी झाडली आणि नेमके काय घडले, याबाबतही पोलिसांना काहीच माहिती समजली नाही. या गोळीबारामुळे शहरात मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी ही घटना घडली.

पोर्टलँडमध्ये रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनाच्यावेळी झालेल्या ट्रम्प यांच्या प्रक्षोभक भाषणानंतर, या भागातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली होती. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात, राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन विजयी झाल्यास पोर्टलँड शहराचे भवितव्य धोक्यात येईल, असे सूचक विधान केले होते. कारण मिनीपोलिस येथे कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेपासून पोर्टलँडमध्ये रोज रात्री निदर्शने सुरू आहेत. अनेकदा या निदर्शनाला हिंसक वळण लागल्याची उदाहरणे घडल्याने मे महिन्यांपासून शेकडो निदर्शकांना अटकही करण्यात आली आहे.

ट्रम्प यांच्या प्रचाराचा भाग म्हणून शनिवारी ट्रम्प यांच्या समर्थकांची रॅली निघणार होती. यात सहाशे वाहनांचा ताफा असल्याने त्यांचा नियोजित मार्गही गुप्त राखला होता. शनिवारीही कृष्णवर्णीयांच्या समर्थनार्थ निदर्शनेही करण्यात येणार होती. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून अनेकांना अटक करण्यात आली होती. तसेच रहिवाशांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र ट्रम्प समर्थक शहराच्या मध्यवर्ती भागात येताच निदर्शकांनी त्यांना रस्ते आणि पुलांवर अडवले. समर्थक आणि निदर्शकांमध्ये आमनासामना होताच साधारणपणे रात्री नऊच्या सुमारास गोळीबार झाला. त्यानंतर तीन गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकल्याचे ‘एपी’ या वृत्तसंस्थेच्या मुक्त छायाचित्रकाराने सांगितले. गोळी लागलेली व्यक्ती ही गौरवर्णीय होती, असेही त्याने सांगितले. यासंदर्भातील व्हिडीओमधून ट्रम्प समर्थकांनी छर्ऱ्यांच्या फैर झाडल्याचे तर निदर्शकांनी बिअर स्प्रे ताफ्यावर उडवल्याचे दिसून आले आहे.

त्या व्यक्तीला छातीत गोळी लागलेली होती. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे पोर्टलँड पोलिस ब्युरोने सांगितले. पोलिसांनी याशिवाय कोणतीही अतिरिक्त माहिती जाहीर केलेली नाही. शनिवारी रात्री उशीरा घटनास्थळी माहिती घेण्याचे काम सुरू होते.