आता ‘हे’ माजी मंत्री म्हणाले, रोहित पवारांना नॉलेज नाही!
नगर: जीएसटी च्या मुद्द्यावर ‘रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. त्यांनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजे,’ हे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे विधान आणि त्याला आमदार रोहित पवार यांनी दिलेले उत्तर ताजे आहे. आता भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनीही रोहित यांच्यावर आरोग्य विभागाशी संबंधित कामावरून अशाच पद्धतीची टीका केली आहे. ‘आरोग्य क्षेत्रातील नॉलेज नसताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कर्जत-जामखेडमध्ये करोनाची स्थिती गंभीर होत आहे,’ अशी टीका प्रा. शिंदे यांनी केली आहे. (Ram Shinde slams Rohit Pawar )
कर्जतमध्ये उभारण्यात आलेल्या एका कोविड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी राम शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. आमदार पवार यांचे नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. जामखेड तालुक्यातील एका आरोग्य अधिकाऱ्याच्या बदलीची पार्श्वभूमी यामागे आहे. काही अडचण आली तर थेट आपल्याशी संपर्क साधा, असा सल्लाही त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिला.
शिंदे म्हणाले, ‘कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात करोना संसर्गाने थैमान घातले आहे. अशावेळी काही नॉलेज नसलेल्या व्यक्ती राजकीय दृष्टीकोनातून आरोग्य विभागाच्या कामात हस्तक्षेप करीत आहेत. यामुळे आपण लोकांच्या जीवाशी खेळत आहोत, याचा विसरही त्यांना पडला आहे. सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर व प्रशासन यांना काम करू द्यावे. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान व अनुभव महत्त्वाचा असतो. तरीही काही जण यात हस्तक्षेप करीत आहेत, हे योग्य नाही. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोनाच्या चाचण्या होत नाहीत. त्या करून रुग्णांवर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे, हा खरा करोना नियंत्रणात ठेवण्याचा पर्याय आहे.’ असेही शिंदे म्हणाले.
शिंदे यांच्या या वक्तव्याला आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची किनार असल्याचे सांगण्यात येते. जामखेड येथील वैद्यकीय अधीक्षकांची अचानक नगरला बदली झाली होती. नागरिकांनी या विरोधात आंदोलन केल्यावर ती रद्द करण्यात आली. शिवाय कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या. पवार यांनी प्रशासनात हस्तक्षेप करून या बदल्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरूनच शिंदे यांनी त्यांच्यावर नाव न घेता निशाणा साधल्याचे दिसून येते.