बीड

काँग्रेसमधील वादाचा आघाडीला फटका नाही; विरोधकांनी स्वप्न पाहू नये: राऊत

मुंबई: काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अध्यक्षपदाच्या अंतर्गत वादाचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणताही फटका बसणार नाही. महाविकास आघाडी सरकार मजबूत आणि स्थिर असल्याचा निर्वाळा देतानाच काँग्रेसच्या वादामुळे राज्यातील आघाडी सरकारवर परिणाम होईल, याची स्वप्न विरोधकांनी पाहू नये, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा निर्वाळा दिला. काँग्रेसमधील वादळ शमलं आहे. २३ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं होतं. त्याचा धुरळा बसला आहे, असं सांगतानाच काँग्रेस पक्षांतर्गत वादामुळे जर्जर झाला आहे. पण काँग्रेसच्या या वादाचा महाराष्ट्राला फटका बसणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या वादामुळे काही घडेल याची कुणी स्वप्न पाहू नये, असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसने राजकारणातील वैभव परत मिळवलं पाहिजे. काँग्रेस पक्षाला मजबूत नेतृत्वाची गरज आहे. देशालाही मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेस सर्वात जुना पक्ष आहे. काँग्रेसला मोठी परंपरा आहे. देशातील सर्व गावात पोहोचलेला काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसने आपलं वैभव पुन्हा मिळवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेत शिवसेना आणि युवा सेना असा वाद नसल्याचं स्पष्ट केलं. शिवसेना आणि युवा सेना वाद असल्याचा भाजपचा प्रचार खोटा आहे. आमचा पक्ष काही चिठ्ठ्याचपाट्यावर चालत नाही, असा टोला लगावतानाच आमच्या पक्षात काय चाललंय हे भाजपला काय माहीत? असा सवालही त्यांनी केला. राजकारणात नवं नेतृत्व आलं पाहिजे. त्यामुळे आम्ही नव्या पिढीला नेतृत्व दिलं आहे, असंही ते म्हणाले.

सुशांतप्रकरणावर बोलण्यास नकार

यावेळी राऊत यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे आहे. त्यांचा तपास सुरू आहे. मुंबई पोलीसही त्यांना चांगलं सहकार्य करत आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यावर आपल्याला प्रतिक्रिया द्यायची नाही. प्रतिक्रिया देऊन तपास कामात हस्तक्षेप करायचा नाही आणि वादही ओढवून घ्यायचा नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राऊत यांनी दैनिक सामानातील रोखठोक या सदरातून आज भाजपवर टीका केली होती. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात असताना फक्त पत्र पाठवूनच काँग्रेसचे २३ नेते थांबले नाहीत, तर त्यानंतर आमच्या पत्रावर काय कार्यवाही केली अशी विचारणा करणारी दोन ‘रिमाइंडर्स’ म्हणजे स्मरणपत्रे पाठवली. हे जरा अतिच झाले. या पत्रांमुळे सोनिया गांधी वैतागून काँग्रेसचे अध्यक्षपद सोडतील व आता तुम्हीच काँग्रेस सांभाळा असे सांगतील असा या ‘पत्रलेखक’ नेत्यांचा डाव होता. तो राहुल गांधी यांनी उधळून लावला आहे. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडतील व त्यानंतर सामुदायिक नेतृत्व म्हणून हे ‘पत्रलेखक’ काँग्रेसवर ताबा मिळवतील हे सर्व भाजपला हवेच होते. पंतप्रधान मोदी यांचे मूळ स्वप्न देश काँग्रेसमुक्त करण्याचेच होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप आणि कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.