राजू शेट्टींचा दुसऱ्या दिवशीही सरकारवर हल्लाबोल
उस्मानाबाद, 28 ऑगस्ट: दुधदरवाढीच्या मागणीवरून शेतकरी संघटना नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुसऱ्या दिवशीही राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्य सरकारमधील मंत्री स्वतःची तिजोरी भरण्यासाठीच निर्णय घेत असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
सरकारनं दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात प्रतिलिटर थेट 5 रुपये अनुदान जमा केलं नाही तर सरकारमधील मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दूधदरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी आणि जनावरांसह उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम शहरात उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यलयावर मोर्चा काढला.
राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.
राजू शेट्टी म्हणाले, मी जरी सरकारमध्ये असलो तरी आतापर्यंत दूध दरवाढीला घेऊन शरद पवार व अजित पवार यांच्यासोबत अनेकदा चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अद्याप चर्चा झाली नाही. ते प्रतिसादच देत नाहीत. किमान ते ‘मातोश्री’बाहेर ही पडत नसल्याचा खोचक आरोप राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
मुख्यमंत्रीसाहेब डोळे उघडा, मातोश्रीच्या बाहेर पडा…
दरम्यान, दुधदरवाढीच्या प्रश्नावर राजू शेट्टी यांनी थेट यांनी गुरुवारी थेट बारामतीत जाऊन आंदोलन केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्रीसाहेब डोळे उघडा, मातोश्रीच्या बाहेर पडा आणि महाराष्ट्रात काय चाललं आहे बघा. अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करीत आहेत ते बघा. यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे सर्वच पक्ष सहभागी आहेत. तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ, असं सध्या सुरु आहे.’ अशा शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांना बारामतीत लक्ष्य केलं.
सरकारच जबाबदार…
दुधाच्या दरात घसरण होण्यास प्रामुख्याने लॉकडाऊन व पर्यायाने केंद्र सरकारच कारणीभूत आहे. लॉकडाऊन झाले नसते तर गायीच्या दुधाचा भाव किमान चाळीस रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला असता. लॉकडाऊन झाल्याने दुधाचा खप चाळीस टक्क्यांनी खाली आला. त्यामुळे दुधाचे भाव पडले. केंद्राच्या लॉकडाऊनमुळे दुध उत्पादकांचे नुकसान होत असेल तर सर्वात आधी केंद्राने मदतीसाठी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा देखील राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.