Newsराजकारण

राज्यात धार्मिकस्थळं, जीम सुरू होणार; संजय राऊत यांनी दिले संकेत!

मुंबई, 27 ऑगस्ट: राज्यात धार्मिक स्थळं मंदिरं आणि जीम सुरू करण्याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी संकेत दिले आहेत. राज्यातील मंदिरे आणि जीम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे, असंही संजय राऊत यांनी गुरूवारी स्पष्ट केलं आहे.

(मोठा दिलासा! राज्य सरकारने केला ‘हा’ टॅक्स माफ)

खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, राज्यातील धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भाष्य केलं आहे. माझ्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असं राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर राज्यातील जनजीवन सामान्य होण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी दिला इशारा..

राज्यातील सर्व धार्मिकस्थळं सुरू करण्याची सर्वप्रथम मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. 31 ऑगस्टपर्यंत राज्यातील मंदिरं सुरू न केल्यास एक लाख वारकऱ्यांसोबत पंढरीतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा देखील प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे. दुसरीकडे भाजपच्या आध्यात्मिक समन्वय समितीने मंदिरं सुरू करण्यासाठी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

(चिनी लष्कराला मदत; अमेरिकेची २४ कंपन्यांवर बंदी)

देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला…

दुसरीकडे, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला. विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतलं जाईल, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

तसेच देशातला प्रमूख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आहे. आता जमिनीवरचे काम त्यांनी सुरू करायला हवं, पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत, असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

(‘या’ कारणामुळे दोन्ही भावांनी घेतला गळफास!)

संजय जाधव मुंबईत…!

परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. संजय जाधव यांनी नाराजीतून खासदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, तीन पक्षांचे सरकार असताना थोडी नाराजी असतेच. संजय जाधव मुंबईत आले आहेत. मार्ग निघेल, असं राऊत यांनी सांगितलं.