‘तो’ शहाणपणा राज्य सरकारनं आधीच दाखवायला हवा होता!
लोणी: सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. पण सरकारने जनतेचे लक्ष विचलित करून सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशाची स्थापना केल्यानंतर विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने सुरू केला आहे. यातून सत्य निश्चितच समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘राज्य सरकारकडे निर्णय घेण्याचे कोणतेच धोरण नाही. शाळा उघडण्यापासून ते महाविद्यालयांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याबाबत सरकारकडे स्वतःची भूमिका नाही. सरकार गोंधळलेल्या अवस्थेत काम करीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘समाजहिताचे कोणतेही निर्णय हे सरकार घेऊ शकत नाही. शेतकरी दूध उत्पादकांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. राज्यात अतिवृष्टी झाली. शेतकरी पुन्हा संकटात सापडला असला तरी सरकारची कोणतीही मदत नाही. दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करतात, पण सरकार जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मंत्र्यांचेच दूध संघ असल्याने त्यांनीच सरकारचे अनुदान दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. ग्राहकांना विक्री केल्या जाणाऱ्या दुधाचे दरही कमी झाले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
कोव्हीड १९ संकटातही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागला किंवा फेकून द्यावा लागला. सरकार नावाची व्यवस्था कोणत्याच संकटात शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला मदत करू शकलेली नसल्याचे ते म्हणाले.
प्रार्थनास्थळे उघडली गेली पाहिजेत याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ‘राज्य सरकारने सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील मॉल सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक पाउल पुढे टाकले. मग मंदिरांबबात निर्णय का घेतला जात नाही. राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय पाच महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळं अर्थचक्र थांबले आहे. सुरक्षिततेचे नियम पाळून मंदीर उघडण्यास सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.