बीड

…हे सरकार जायचे की नाही हे बाप्पाच ठरवतील, नारायण राणेंचं आता गणरायाला साकडं

मुंबई, 22 ऑगस्ट : महाविकास आघाडी सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे नेते नारायण राणे यांनी आता हे सरकार जाण्यासाठी आता गणपती बाप्पाकडेच सर्व काही सोपवले आहे. ‘महाविकास आघाडी सरकार जाणार नाही नाही, हे आता बाप्पाच ठरवेल’ असं साकडं राणेंनी गणरायाला घातलं आहे.

आज देशभरात गणरायाचे आगमन झाले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही नारायण राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आहे. भक्तीभावाने नारायण राणे यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. यावेळी न्यूज18 लोकमतशी बोलत असताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले.

‘आमच्या घरी पाच दिवस गणराय आहे. राज्यातील कोरोना संकट नष्ट होवो तसंच राज्य प्रगती होवो आणि राज्यातील ठाकरे सरकारला चांगली सदबुद्धी देवो’ असं साकडंच राणेंनी घातलं आहे.

तसंच, ‘महाविकास आघाडी सरकार हे आज ना उद्या जाणारच आहे.  हे सरकार जायचे की नाही हे बाप्पाच ठरवतील’ असंही साकडं आता राणेंनी गणरायाकडे घातलं आहे.

यावेळी त्याचे सुपूत्र आणि आमदार नितेश राणे हेही उपस्थितीत होते. ‘आता गणरायाचे आगमन झाले आहे. पुढील पाच दिवस हे फक्त बाप्पांसाठी असणार आहे. त्यामुळे या दिवसात आता काही दिवस चिमटे नको, थोडे शांत राहु या’ असं नितेश राणे म्हणाले.

विशेष म्हणजे, नारायण राणे भाजपमध्ये दाखल झाल्यापासून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. याआधीही त्यांनी ठाकरे सरकार अकरा दिवसात पडेल, असे भाकितच वर्तवले होते. पण, तसे काही घडले नाही. आता हे सरकार नोव्हेंबरमध्ये पडेल, असे दावे भाजपचे काही नेते करत आहे. त्यात आता राणेंनी ठाकरे सरकारला पाडण्याची जबाबदारी आता बाप्पावरच सोपवली आहे.