पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहले महेंद्रसिंग धोनीला पत्र, म्हणाले…
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. मोदींनी जर धोनीला भारताकडून खेळायला सांगितले तर तो नक्कीच पुन्हा ब्ल्यू जर्सीमध्ये दिसू शकतो. त्यामुळे मोदी यांनी धोनीला पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ते पाहा…
धोनीने निवृत्ती घेतली असली तरी त्याचे करोडो चाहते आणि बऱ्याच आजी-माजी खेळाडूंना धोनीने पुन्हा एकदा भारताकडून खेळावे, त्याने अखेरचा सामना मैदानात खेळावा आणि निरोप घ्यावा, अशी भावना व्यक्त केली होती. काही जणांनी तर मोदी यांनी जर धोनीला पुन्हा भारताकडून खेळण्याची विनंती केली तर तो नक्कीच खेळेल, असेही म्हटले होते. त्यानंतर मोदी यांचे हे पत्र आले आहे. त्यामुळे मोदी यांनी नेमकं धोनीला काय म्हटलं आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
मोदी यांनी पत्रामध्ये धोनीला म्हटले आहे की, ” धोनी तुझ्यामध्ये ‘न्यू इंडिया’ चा आत्मा दिसतो. ‘न्यू इंडिया’मध्ये युवांची नियती त्यांच्या कुटुंबियांची ओळख दाखवत नाही तर युवा खेळाडू स्वत: आपले नाव कमावतात आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतात. धोनी तू, १५ ऑगस्टला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि हा व्हीडीओ बरंच काही सांगून जातो. यामध्ये खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावं, हेदेखील समजते.”
मोदी आपल्या पत्रामध्ये पुढे म्हणाले की, ” धोनी, तुझ्या निवृत्तीमुळे १३० करोडो भारतीय निराश झालेले आहेत. पण गेल्या दीड दशकांमध्ये जे काही तु आम्हा सर्वाना दिले त्यासाठी देशवासीय तुझे आभारी आहेत. तुझ्या कारकिर्दीकडे जर आम्हाला पाहायचे असेल तर काही अंक किंवा आकड्यांचा चष्मा घालून आम्हाला पाहावे लागेल. तू भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये सामील आहेस. देशाला जगभरात अव्वल स्थानावर नेण्याची भूमिका तू योग्यपणे वठवली आहेस. क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुझे नावं, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम कर्णधार आणि कोणताही संकोच न करता सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये नक्कीच घेतले जाईल.”
मोदी यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की, ” कठीण परिस्थितीमध्ये आत्मनिर्भर कसे असावे, हे तू दाखवून दिले. त्याचबरोबर एखादा सामना संपवण्याची तुझी शैली खास होती. खासकरून तु २०११ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळलेली अविस्मरणीय खेळी. धोनी, तुला फक्त आकडेवारीमध्ये आम्ही लक्षात ठेवू शकत नाही, तर एकहाती सामना जिंकवण्यासाठी तू आमच्या मनात राहशील. एका लहान शहरामधून तू आलास आणि एवढं मोठं नाव कमावलं. आजच्या करोडो युवांसाठी तू नक्कीच एक प्रेरणा आहेस. स्वत:ला सर्वोच्च स्तरावर कसे घेऊन जायचे, याचा त्यांच्यापुढे तू नेहमीच आदर्श असशील.”