News

महाराष्ट्रासाठी शरमेची घटना, औरंगाबादच्या MGM रुग्णालयात महिला डॉक्टरासोबत धक्कादायक प्रकार

औरंगाबाद, 20 ऑगस्ट : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. जीवाची बाजी लावून डॉक्टर कोरोनाशी दोन हात करत आहे. एकीकडे डॉक्टर रुग्णांना कोरोनाच्या मगरमिठ्ठीतून बाहेर काढत आहे तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये लाजीरवाणी घटना घडली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांनी एका महिला डॉक्टरला मारहाण केली आहे.

औरंगाबाद शहरातील महात्मा गांधी मिशन, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली आहे. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. एमजीएम रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला.

आपल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली. पण त्यावर समाधान न झाल्यामुळे त्यांनी थेट मोर्चा कोरोनाबाधित कक्षाकडे वळवला. कोरोनाबाधित कक्षात घुसून नातेवाईकांनी महिला डॉक्टरालाच मारहाण केली.

यावेळी नातेवाईकांनी कोरोना कक्षात साहित्यांची तोडफोड केला. कोरोना कक्षाचीच नासधूस करण्यात आली.

या प्रकरणी एमजीएम प्रशासनाने सिडको पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एमजीएम प्रशासनाच्या तक्रारीवरुन मृत रुग्णाच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा केला आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6,28,642 वर

दरम्यान, गेल्या 24 तासांत 13,165 नवे कोरोनारुग्ण राज्यात सापडले आहेत. सध्या सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate)  वाढता असला, तरी रुग्णवाढीचा दर आणि कोरोनाचा विषाणू गावागावात पसरण्याचा आवाका वाढला आहे. गेल्या 24 तासांत  9011 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 4,46881 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात 346 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे.

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 6,28,642 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 21033 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,60,413 रुग्ण आहेत.

एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आकडेवारीने स्पष्ट झालं आहे. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. राज्यातला मृत्यूदर 3.35 एवढा झाला आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 2 टक्क्यांच्या खाली आहे.