महाराष्ट्रNews

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी बसेसला परवानगी

मुंबई, 19 ऑगस्ट : अनलॉकचे नियम हळूहळू शिथिल होत असताना राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी फक्त एसटी बससाठी असणार आहे. जिल्ह्याबाहेर एसटी बस सेवा सुरू होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आणि बससेवाही थांबवण्यात आली. त्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आतुरलेले अनेक चाकरमानी शहरातच अडकून बसले. हक्काची लालपरीही बंद असल्याने लोकांचे मोठे हाल झाले. मात्र आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एस बस सेवेला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ईपासही गरज नसेल. मात्र खासगी चारचाकी वाहनांसाठी मात्र ईपास आवश्यक असणार आहे.

दरम्यान, लॉकडाऊन काळात बस सेवा बंद राहिल्याने एसटी महामंडळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली.

सह्याद्री येथे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर 30 ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि 5 ठिकाणी एल.एन.जी.पंप (liquifid Natural Gas) सुरु करण्यात येणार आहे. सदर पेट्रोल-डिझेलपंप/ एल.एन.जी.पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.