News

आंघोळीला जातो सांगून करोना रुग्ण पळाला

नागपूर – मेडिकलमध्ये चांगली वागणूक मिळत नाही. औषधी मिळत नाही. घरातील कुणाशीही संवाद नाही. यामुळे घाबरलेल्या एका करोना पॉझिटिव्ह रुग्णाने आंघोळीचे निमित्त साधून थेट मेडिकलमधून बोंब ठोकली. घर गाठले. मात्र, कुणीच दिसून न आल्याने घरासमोरच रडत बसला. ही माहिती मिळताच मेडिकल व पोलिसांची तारांबळ उडाली. पथकाने घरासमोर रडत बसलेल्या रुग्णाला समजावून परत मेडिकलमध्ये आणले.

रमेश(नाव बदलले) हा रुग्ण धन्वंतरीनगर येथे भाड्याने राहतो. आठवडाभरापूर्वी तो पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला मनपाचे पथक मेडिकलमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्याच्या घरातील इतर सदस्यांचीही करोना चाचणी करण्यात आली. तेदेखील पॉझिटिव्ह आले. दुसऱ्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. त्यामुळे रमेशचा घरच्यांशी संवादच तुटला. इतरांकडे बघत तो घाबरला. दोन दिवसांपूर्वी त्याला वॉर्डातील कर्मचाऱ्याने आंघोळीला जाण्यास सांगितले. हीच संधी साधत त्याने थेट घर गाठले. घराचा परिसर चारही बाजूने सील असल्याने उडी घेत घरी गेला. पण, घराला कुलूप होते. नंतर तो घरासमोरच रडत बसला. ही माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी गर्दी केली. नागरिकांनी त्याला परत जाण्यास सांगितले. काही नागरिक तर त्याला रागावू लागले. काही वेळातच रुग्णाच्या पाठोपाठ आरोग्य पथक व पोलिस आले. त्यांनी त्याला समजावत परत रुग्णालयात घेऊन गेले.