राजकारणNews

राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी, तयार झाले दोन गट!

पुणे, 15 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आजोबा शरद पवार यांनी नातवाची कानउघडणी केल्यामुळे पवार कुटुंबात दोन गट पडल्याचे बोलले जात आहे.

पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सीबीआय चौकशीची मागणी केली होती. एवढंच नाहीतर एकीकडे शरद पवार यांनी राम मंदिराबद्दल वेगळी भूमिका मांडली असताना दुसरीकडे नातवानेच जय श्रीरामचा नारा दिला होता. त्यामुळे अखेर ‘नातवाच्या मताला कवडीची किंमत देत नाही, तो अजून अपरिपक्व आहे’ असं म्हणत शरद पवारांनी पार्थचे कान उपटले.

हे वाचा- …यामुळे नाराज आहेत पार्थ पवार!

पण, जाहिररित्या आजोबांनी कानउपटल्यामुळे पवार कुटुंबात दोन गट पडले आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीत दोन गट पडले असून बहुंताश गट हा शरद पवारांच्या बाजूने आहे. पवार कुटुंबात गोडवा कायम राहावा म्हणून अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी शनिवारी घरातील सर्व सदस्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे.

या दोन गटांपैकी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राजेंद्र टोपे, छगन भुजबळ यांच्यासह इतर नेते पवारांच्या बाजूने उभे आहे. पार्थ यांनी वेगळी भूमिका कशी मांडली याबद्दल संपूर्ण माहितीही पवारांच्या कानी घालण्यात आली आहे.

हे वाचा – अजित पवारांचा घेतला मोठा निर्णय

खरंतर, विधानसभेच्या वेळीही श्रीनिवास पवार यांच्या मध्यस्थीनेच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये समेट घडला होता. त्यामुळे यावेळीही पवार कुटुंबात पार्थवरून निर्माण झालेला तिढा श्रीनिवास पवारच सोडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, पवार कुटुंबाच्या या एकूण वादात संपूर्ण कुटुंब हे पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.

दरम्यान, पार्थ पवार रात्री बारामतीला पोहोचणार असे अपेक्षित होते. पण, पार्थ अजूनही पुण्यातच मुक्कामी आहे. अजित पवार हे जेव्हा बारामतीत पोहोचतील तेव्हाच ते बारामतीत पोहोचणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.