अजित पवारांचा घेतला मोठा निर्णय
राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी अँटिजेन किट घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देत 50 हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ‘कोरोना’ रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
‘कोविड-19’ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीत सहभागी झाल्या.
ग्रामीण भागातील कोरोना रुग्णदर व मृत्यूदर तसेच प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश होण्यासाठी कार्यवाही करावी. हवेली, खेड, मावळ, शिरुर, पुरंदर अशा रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी प्रशासकीय अधिकारी व आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे.