बीड

पाकिस्तानच्या पोटात उठला गोळा; आध्यक्षपदाच्या नियुक्तिवरुन शाब्दिक चकमक!

13 Aug :- भारत देशाचा पारंपरिक शत्रु म्हणून जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या पाकिस्तान देशाला भारताचे चांगले झालेले आजवर कधी देखवलेले नाही.हेच आयसीसीच्या बैठकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेष मतदानाद्वारे निवड करण्याची मागणी करत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बीसीसीआयच्या सामान्य मतदानाद्वारे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला.

बुधवारी आयसीसीची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. त्यात स्वतंत्र अध्यक्षाची निवड करण्यासाठी काही नामांकने निश्‍चित करण्यात येणार होती. मात्र, भर बैठकीतच बीसीसीआय व पाक मंडळाच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक घडली.अखेर ही बैठक कोणताही निर्णय न होता संपुष्टात आली. आयसीसीने काही वर्षांपूर्वी ‘स्वतंत्र अध्यक्ष असावा’ ही संकल्पना मांडली होती, त्यावेळीही पाक मंडळाने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी बीसीसीआयसह अनेक देशांनी आयसीसीच्या प्रस्तावाला मान्यता दिली व पाकचा विरोध हवेतच विरला. त्यावेळी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची या पदावर नियुक्‍ती करण्यात आली होती. त्यांनी नुकतीच आपली मुदत संपण्यापूर्वी या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद गेले महिनाभरापासून रिक्‍त आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्यांचे अर्ज स्वीकारून नामांकने जाहीर केली जाणार होती. मात्र, त्याचवेळी या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

गेल्या काही वर्षांपासून जागतिक क्रिकेटवर बीसीसीआयचे वर्चस्व वाढल्याने पाक मंडळाच्या पोटात गोळा येत आहे. करोनामुळे ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा आयसीसीने बीसीसीआयच्याच दबावाखाली रद्द केल्याचे आरोपही पाक मंडळाने केले होते. तसेच पाकिस्तान सुपरलीगमधील उर्वरित सामनेही बीसीसीआयच्याच दबावामुळे रद्द करावे लागल्याने त्यांना बीसीसीआयला कोंडीत पकडण्याची या बैठकीत नामी संधी मिळाली होती. मात्र, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यासह अनेक देशांनी बीसीसीआयच्या सामान्य मतदानाद्वारे अध्यक्ष निवडीचा प्रस्तावाला समर्थन दिल्याने पाक मंडळ पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे.

सामान्य मतदानात कोणत्याही व्यक्‍तीला किमान 9 देशांची मते असल्याचे सिद्ध करावे लागते तर विशेष मतदानाद्वारे 12 मते आवश्‍यक असतात. पाक मंडळाला सहयोगी देशांकडून समर्थन मिळेल, असा विश्‍वास वाटल्याने त्यांनी बीसीसीआयच्या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, बैठकीतच गोंधळ झाल्याने ही बैठक कोणत्याही निर्णयाविनाच संपली. आता येत्या आठवड्यात पुन्हा एकदा ही बैठक घेतली जाणार असून त्यात आयसीसी काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.