राजकारण

पार्थ पवारांना कवडीचीही किंमत नाही!

 शरद पवारांनी केली नातवाची कानउघडणी!

राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांना शरद पवारांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी तातडीची बैठक होत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.

या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. बुधवारी सकाळी पवारांनी जाहीरपणे ही कानउघडणी केली होती.अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.पार्थ यांनी केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.


‘माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्वव आहे’ अशा शब्दांत शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलीच कानउघडणी केली होती.तसंच ‘सुशांत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या 50 वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.सुशांतसिंग प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण नाही. त्यामुळं कुणी काय आरोप केले यात मी खोलात जाणार नाही.

माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होते. परंतु, त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते.’ असंही पवार म्हणाले.त्याचबरोबर, ‘सातारा जिल्ह्यात एका शेतकऱ्यांने मला विचारलेही याबद्दल. त्यालाही याबद्दल आश्चर्य वाटते. 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी त्याची नोंद घेतली जात नाही’ असंही पवार म्हणाले.