Newsराजकारण

दहावीनंतर २५ वर्षांनी झारखंडच्या शिक्षण मंत्र्यांनी घेतला अकरावीत प्रवेश

रांची : झारखंडचे (Jharkhand) शिक्षण मंत्री जगरनाथ महतो (HRD Minister Jagarnath Mahto) यांनी नुकताच अकरावीत प्रवेश घेतलाय. डुमरीमधल्या एका सरकारी महाविद्यालयात त्यांनी अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज दाखल केला. ५३ वर्षीय जगरनाथ महतो यांनी २५ वर्षांपूर्वी १९९५ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. दहावीत ते पासही झाले होते. ‘विरोधकांकडून सतत केल्या जाणाऱ्या टीकेनंच मला पुढे शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं’ असं महतो यांनी म्हटलंय.

जेव्हापासून जगरनाथ महतो यांची मानव संसाधन विकास (एचआरडी) मंत्री पदी निवड करण्यात आली तेव्हापासून त्यांना सामान्यांसोबतच आपल्या विरोधकांच्या टीकेचाही सामना करावा लागला. ‘जेव्हापासून मला झारखंडचं शिक्षण मंत्री बनवण्यात आलं तेव्हापासून लोकांचा एक वर्ग माझ्या शैक्षणिक योग्यतेवर आक्रमक आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला’ असं महतो यांनी म्हटलंय.

‘स्वत:मध्ये सुधारणा करत सुरुवात करतोय. मॅट्रिक पास केल्यानंतर परिस्थितीनं मला शिक्षणापासून दूर केलं होतं. आज तेच अंतर कमी करण्याच्या इच्छेनं मला प्रेरित केलं. इंटरमीडिएट शिक्षणाच्या हेतुनं मी माझं नामांकन देवीमहतो इंटर कॉलेज नावडीहमध्ये केलं’ असं ट्विट करून जगरनाथ महतो यांनी याबद्दल माहिती दिलीय.

महतो हे पुढे आर्टसचं शिक्षण घेणार आहेत. ‘शिक्षणासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं, हे मी आज सिद्ध केलंय. मी हे अगोदरही म्हटलं होतं आणि आजही म्हणतोय, की जेव्हा मी शिक्षण मंत्री म्हणून शपथ घेतली होती, तेव्हापासून अनेक जण म्हणत होते की दहावी पास शिक्षण मंत्री काय करणार? मी शिकणार आणि राज्यातील मुलांनाही योग्य शिक्षण मिळेल याची खातरजमा करणार. मी वर्गातदेखील जाणार आहे. मंत्रालयातही काम करणार आहे. जनतेचंही काम करणार आहे, शेतकऱ्यांचीही काम करणार आहे’ असंही महतो यांनी उत्साहानं म्हटलंय.