महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार- उद्धव ठाकरे
दि. १२: देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.
आज प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार विविध राज्यांचे मुख्य सचिव आदि उपस्थित होते.