राजकारण

आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नाकातून आलं रक्त!

दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उत्तर प्रदेशमध्ये राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये युद्ध स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. याच प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी बैठक बोलावली होती. बैठक सुरु असतांनाच त्यांच्या नाकामधून रक्त येऊ लागलं. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांनी शर्मा यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

उपमुख्यमंत्री शर्मा यांनी जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी सक्रिट हाऊसवर बैठक बोलावली होती. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व जण हजर होते. बैठक सुरु असतांनाच उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली त्यामुळे सगळेच अधिकारी घाबरले.तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं.

डॉक्टरांनी शर्मा यांची तपासणी केली. त्यानंतर काळजीचं कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं. काही वेळातच त्यांना बरं वाटल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शर्मा यांचं ब्लड प्रेशर आणि इतर गोष्टी सामान्य आहेत अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.नाक कोरडं पडल्याने रक्त आलं असावं अशी शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शर्मा यांनी बैठक पूर्ण केली आणि लोकप्रतिनिधींशींही चर्चा केली. त्यानंतर ते पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले.