NewsPopular News

लस आल्यानंतर करोना जाणार!; WHO म्हणतेय की…

जिनिव्हा: करोनाच्या थैमानामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे करोनाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही लस चाचणी अंतिम टप्प्यात असून येत्या एक दोन महिन्यात लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने लशीबाबत मोठे विधान करत इशारा दिला आहे. लस आल्यानंतर चुटकीसरशी करोना जाईल, असे समजणे चुकीचे ठरेल असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्योसिस यांनी म्हटले.

करोनाला अटकाव करणारी लस उपलब्ध झाल्यानंतर करोनाचा खात्मा करण्यात यश मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेनंतर संसर्गाची चिंता कायम राहणार असल्याचे चित्र आहे. करोनाची लस ही जादूची लस नसणार. त्यामुळे करोनाविरोधात सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्योसिस यांनी म्हटले. करोनाच्या अटकावासाठी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी उपाययोजनांवर भर द्यावाच लागणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांचे सल्लागार डेविड मॉरेंस यांनी सांगितले की, लस विकसित करण्याचा प्रयत्न हे अंधारात बाण मारण्यासारखे आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लस चाचणीचे परिणाम चांगले येतात. मात्र, अंतिम टप्प्यातही लस चाचणीचे चांगले, सकारात्मक परिणाम येतीलच याची काही खात्री नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पहिल्याच टप्प्यात आम्ही यशस्वी होऊ आणि येत्या काही महिन्यात आपल्याकडे लस असेल असा विश्वासही मॉरेंस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जगभरात करोनाला अटकाव करणारी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात सुरू आहे. करोना लसीची चाचणीचा अंतिम टप्प्यातील परिणाम समोर आले नसतानाही कोट्यवधी लस खरेदी करण्यात येत आहे. सध्या सहा कंपन्यांची लस चाचणी अंतिम टप्प्यात आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली आणि चीनच्या दोन लशींचा समावेश आहे. तर, दुसरीकडे रशियानेदेखील आपली लस नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ ऑगस्ट रोजी रशिया आपली लस नोंदणी करणार आहे. मात्र,रशियाने जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांप्रमाणे चाचणी केली नसल्यामुळे ही लस वापरणे धोकादायक ठरू शकते असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.