मुंबईत कोरोनाचा रुग्ण आता फक्त आवाजावरूनही सापडणार, असा आहे पालिकेचा नवा प्लॅन!
मुंबई, 09 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. मुंबई जास्तीत जास्त चाचणी घेण्यावर भर दिला जात आहे. पण, आता मुंबईत आवाजाच्या नुमना घेऊन कोविड -19 चे निदान करण्यात येणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत पुढील आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची चाचणी करण्यासाठी आवाजाचा नमुना घेऊन चाचणी केली जाणार आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये एक हजार संशयित रुग्णांची पहिल्या टप्प्यात चाचणी केली जाणार आहे’ अशी माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. प्राथमिक स्तरावरही चाचणी केली जाणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला आणि योग्य निकाल हाती आले तर याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
फ्रान्स आणि इटलीसह काही युरोपियन देशांमध्ये कोविड -19 चे रुग्ण शोधण्यासाठी व्हॉईस अॅनालिसिसचा वापर करण्यात आला आहे. आपल्याकडेही नवी मुंबई अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एका गटाने व्हॉईस अॅनालिसिसचा प्रोग्राम सुरू केला होता. त्याचाच वापर आता केला जाणार आहे.
‘संशयित रुग्णाच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याची तुलना ही आरटी-पीसीआर निकालांशी केली जाणार आहे’, असंही काकाणी यांनी सांगितले.
‘जर हा प्रयोग यशस्वी झाला तर मुंबईतील इतर रुग्णालयांमध्येही याचा वापर केला जाईल, ज्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांपर्यंत कमी वेळेत पोहोचता येईल’, असा विश्वासही ककाणी यांनी व्यक्त केला.
कशी होणार चाचणी?
याआधी कोरोना झालेल्या रुग्णांच्या आवाजाचा डेटा तयार करण्यात आला आहे. हा डेटा एका अॅपमध्ये टाकण्यात आला आहे. नवीन एखाद्या संशयित रुग्णाला स्मार्ट फोन किंवा कॉम्प्युटरद्वारे आपल्या आवाजाचा नमुना रेकॉर्ड करायचा आहे. त्याच्या आवाजाचा नमुना हा कोरोनाबाधित रुग्णांच्या आवाजाशी तुलना केली जाईल, त्यातून हा अॅप कोरोनाची लागण झाली आहे की नाही याचे परिक्षण करेल, आणि रिपोर्ट देईल.
‘या प्रकल्पाला अजून मंजुरी देण्यात आली नाही. संपूर्ण नियमांचे पालन करून आणि हा प्रकल्प किती फायदेशीर आहे, याची खात्ररजमा करून लवकरच या प्रकल्पाला परवानगी दिली जाणार आहे’, असंही एका पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.