मी लाईट बिल भरणार नाही, तुम्हीही भरु नका, आमदार हितेंद्र ठाकूर संतापले
हितेंद्र ठाकूर यांच्या नव्या आणि जुन्या विवा कॉलेज हे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र तरीही त्यांना 5 लाख रुपयांचे वीज बिल आकरण्यात आले आहे. हे वीज बिल पाहून हितेंद्र ठाकूर यांना जबरदस्त शॉक लागला. या वीज बिलानंतर हितेंद्र ठाकूर यांनी महावितरण केवळ वीज ग्राहकांना लुटण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
“मी स्वत: वीज बिल भरणार नाही, तुम्ही सुद्धा भरु नका?” असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. “मी तुमच्यासोबत उभा आहे,” असे आवाहन हितेंद्र ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील घराचे वीजबिल भरमसाठ आले आहे. लॉकडाऊन काळात एकनाथ खडसे यांना 1 लाख चार हजाराचे बिल आल्याने, त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वाढीव बिलं येत आहेत. सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे बिल अवास्तव आहे, ते न भरण्यासारखे आहे, असं खडसे म्हणाले. नागरिकांना येत असलेल्या अवास्तव बिलामध्ये सवलती, सूट द्या, अवास्तव बिलाच्या तपासण्या करा, अशी मागणी त्यांनी केली.