Sanjay Dutt: संजय दत्त लीलावतीत दाखल; करोना रॅपिड टेस्टचा अहवाल निगेटिव्ह
मुंबई: बॉलीवूडमध्ये करोनाची दहशत पसरली असताना आज अभिनेता संजय दत्तला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. संजय दत्तची रॅपिड करोना चाचणी करण्यात आली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तूर्त चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले.
संजय दत्तची ऑक्सिजन लेवल कमी जास्त होत असल्याने तसेच श्वास घेण्यास काहीसा त्रास होत असल्याने त्याला आज सायंकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला सध्या नॉन-कोविड आयसीयू वॉर्डात ठेवण्यात आले असून रुग्णालयात दाखल होताच त्याची
रॅपिड टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर संजय दत्तचा स्वॅब घेऊन तो तपासणी साठी पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, संजय दत्तच्या काही आणखी तपासण्या करण्यात येणार आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. नॉन-कोविड रुग्णावर ज्याप्रकारेच उपचार होतात त्याप्रमाणे संजय दत्तवर उपचार सुरू असल्याचे लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. रविशंकर यांनी सांगितले.