मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला तीव्र विरोध;काळे कपडे परिधान करून होणार आंदोलन!
8 Aug :- मराठी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार निष्काळजीपणा दाखवत आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले आहे. मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली 13 मराठा संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत सरकार विरोधात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या 9 ऑगस्ट क्रांती दिनी नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांचा मराठा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येणार आहे.
काळे कपडे परिधान करून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या त्यांचा नाशिकचा दौरा रद्द केला तर पुण्यातील बालगंधर्व चौकात मराठा समनव्य समितीकडून जागरण गोंधळ घालत सरकारला जाब विचारला जाईल. त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असलेल्या उपसमितीवरुन मंत्री अशोक चव्हाण यांना हटवा, अशी मागणी केली आहे.
आज पुण्यात मराठा समनव्य समितीची बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली आहे.मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा आवाज ऐकला नाही तर येत्या 17 ऑगस्टला राज्यात सर्वत्र आंदोलन छेडण्यात येईल. राज्य सरकार आपली भूमिका जाहीर करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन पुढे सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.