एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आजच बँक खाते तपासून पाहा!
पुणे, 08 ऑगस्ट : गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. तिजोरीत खडखडात झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, अखेर राज्य सरकारने निधी मंजूर केल्यानंतर आज कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून आज परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकानुसार, एसटी कर्मचाऱ्यांना आजच पगार हा बँक खात्यात जमा होणार आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील थकीत पगार सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मार्च महिन्यातील थकीत 50 टक्के एप्रिल 75 टक्के तर मे महिन्यातील 100 थकीत वेतन एसटी कामगारांना मिळणार आहे.
गेल्या महिन्याचा 50 टक्के या महिन्याचा 100 टके पगार देण्यात येणार आहे. मे महिन्याचा पगार सुद्धा देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर जून आणि जुलै महिन्यातील पगारही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच यापूर्वी कोरोना महामारीत कपात केलेला पगारही मिळणार आहे.
मंगळवारीच राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी 550 कोटी मंजूर केले होते. राज्य सरकारने निधी मंजूर केल्यानंतर आज कर्मचाऱ्यांना पगाराचे वाटप करण्यात येणार आहे.