अखेर नगरसेवकानं कोरोना रुग्णाला उचलून नेलं!
7 Aug :- कोरोना विषाणूच्या हाहाकाराने त्रस्त असलेला सामान्य नागरिक दैनंदिन आयुष्यात अनेक आर्थिक अडचणींना तोंड देत आयुष्य जगत आहे.आशा भयाण परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास जर चुकून सामान्य माणूस खाजगी रुग्णालयात दाखल झाला तर मग मिटलेच कारण कोरोना बरा होईपर्यंत खाजगी रुग्णालयातील बिलाचे आकडे हृदयाचे ठोके वाढवणारे असते.अशीच एक घटना कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. या प्रकरणी आता महापालिका कारवाई करत आहे.
एका 70 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिला कल्याण येथील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सदर महिलेच्या नातेवाईकांनी सुरूवातीला हॉस्पिटलमध्ये 80 हजार रुपये डिपॉझिट भरण्यास सांगण्यात आलं. 14 दिवस उपचार घेतल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनानं महिलेला डिस्चार्ज देताना अतिरिक्त 90 हजारांची मागणी केली. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक बिल बघून चांगलेच हैराण झाले. रुग्णाच्या नातेवाईकांडे पैसे नसल्यानं त्यांनी 20 हजार रुपये व्याजाने घेतले. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना सर्व प्रकार सांगितला.
नगरसेवक गायकवाड यांनी पीडित कुटुंबाल 10 हजार रुपयांची मदत केली. मात्र, रुग्णालय प्रशासनानं 30 हजार रुपये घेण्यास नकार देऊन संपूर्ण रक्कम भरण्याचा तगादा लावला होता. ही बाब नगरसेवक महेश गायकवाड यांना समजली. त्यांनी थेट रुग्णालयात जाऊन याबाबत जाब विचारला. रुग्णालयाने रुग्णाला पीपीई किटचे 50 हजार लावले होते. इतकेच नव्हे तर रुग्णालयीन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या खर्च देखील रुग्णाच्या माथी मारला होता. संतप्त महेश गायकवाड यांनी पीपीई किट परिधान महिलेला बेडवरून उचलून रुग्णालयाच्या खाली आणले आणि रिक्षात घालून या महिलेला घरी नेले.
दरम्यान, राज्य सरकारनं कोरोना रुग्णांची होणारी लूट थांबवण्यासाठी नियमावली केली आहे. तसेच रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता या रुग्णालयावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. आता घटनेनंतर कोरोना काळात रुग्णाला लुबाडणाऱ्या हॉस्पिटलवर काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.