सांगलीतील १०४ गावांत धाकधूक
सांगली: कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पुराचा धोका असलेल्या जिल्ह्यातील ७५ गावांना बोटींसह अत्यावश्यक साहित्य देण्यात आले आहे. दरम्यान, ‘ एनडीआरएफ ‘च्या जवानांसह गृह खात्याच्या स्वतंत्र पथकाने जिल्ह्यातील आपत्कालीन सज्जतेचा आढावा घेतला आहे.
गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने सांगली, कोल्हापूरकरांनी पुन्हा महापुराचा धसका घेतला आहे. कोल्हापूर येथील राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पूरस्थिती बिकट होण्याचा धोका वाढला आहे. या तुलनेत सांगलीतील परिस्थिती अजूनही नियंत्रणात असली तरी, जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी जय्यत पूर्वतयारी केली आहे. जिल्ह्यात १०४ पूरप्रवण गावे आहेत. या सर्वच गावांना बोटींसह आपत्कालीन स्थितीत जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवले जात आहे. पहिल्या टप्प्यात ७५ गावांना आपत्ती व्यवस्थापन किटचे वाटप करण्यात आले. यात संपर्क साधण्यासाठी मेगा फोन, लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी दोर, लाइफ जकेट, टॉर्च, आदी वस्तुंचा समावेश आहे. वाळवा आणि पलूस तालुक्यातील चार गावांना बोटी दिल्या आहेत.
पूरस्थितीत सांगलीकरांच्या मदतीसाठी एनडीआरफची दोन पथके १५ जुलैपासूनच जिल्ह्यात तैनात आहेत. एक पथक सांगली शहरात आहे, तर दुसरे पथक आष्टा येथे आहे. सांगली शहरातील पथकाने आपत्कालीन सज्जतेचा आढावा घेतला. गृह खात्यानेही सांगली जिल्ह्यातील आपत्कालीन सज्जतेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र पथक पाठवले आहे. या पथकाने शुक्रवारी दुपारी कृष्णा नदीच्या पाणी पातळीची पाहणी केली. पूरस्थितीत नागरिकांसाठी निवारागृहे सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.
पावसाचा जोर कमी झाला
चांदोली धरण परिसर आणि शिराळा तालुका वगळता सांगली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर बराच कमी झाला. जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने उघडीप दिली आहे. सातारा जिल्ह्यासह कोयना धरणा क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी २३ फुटांवर पोहचली आहे. सांगलीत इशारा पातळी ३९ फूट, तर धोका पातळी ४३ फुटांची आहे.