बीड

मी नव्हे, सुशांतसिंह प्रकरणाचा तपासच क्वॉरंटाइन झालाय; विनय तिवारींचा गंभीर आरोप

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र सरकारने मला नव्हे तर, सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपासच क्वॉरंटाइन केला आहे, असा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे.

बिहारला जाण्यापूर्वी विनय तिवारी यांनी मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्र सरकारने मला क्वॉरंटाइन केलं नाही. तर सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपासच क्वॉरंटाइन केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेमुळे सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप विनय तिवारी यांनी केला. मुंबई महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याने मला भेटून माझी क्वॉरंटाइनमधून मुक्तता करण्यात आलेलं सांगितलेलं नाही. मला पालिकेने फक्त मेसेज पाठवून ही माहिती दिली. त्यामुळे मी आता पाटण्याला जायला निघालो आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, आज सकाळी तिवारी यांची पालिकेने क्वॉरंटाइनमधून मुक्तता केली होती. सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी बिहारमध्ये सुशांत आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांचं एक पथक मुंबईत आलं होतं. या पथकाने तपासही सुरू केला होता. काही दिवसानंतर लगेचच एसपी विनय तिवारीही या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र मुंबईत येताच तिवारी यांना पालिकेने १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन केलं होतं. त्यांना या १४ दिवसात बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. शिवाय क्वॉरंटाइनबाबतचे सरकारी नियमही दाखविण्यात आले होते. त्यामुळे बिहरा विरुद्ध मुंबई पोलीस असा संघर्ष निर्माण होऊन मोठा गदारोळ झाला होता.

या घटनेचे राजकीय पडसादही उमटले होते. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप झाला होता. बिहार पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने करू नये म्हणूनच तिवारी यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही तिवारी यांना महाराष्ट्रात चांगली वागणूक मिळाली नसल्याची खंत व्यक्त करत हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. तर बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पालिकेला तिवारी यांची क्वॉरंटाइनमधून मुक्तता करण्याची मागणी केली होती.