खासदार नवनीत राणा कोरोनाच्या चपेटीत!
5 Aug :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह त्याचं अख्ख कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. धक्कादायक म्हणजे आता खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे.राणा कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या सदस्यांमध्ये नवनीत राणांच्या मुले आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे. नवनीत राणा यांचेही रिपोर्ट सकाळी पॉझिटिव्ह आला होता, तर रवी राणा यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, आमदार रवी राणा हे नागपूरला त्यांच्या आई-वडिलांच्या सेवेत आहेत. अशात नवनीत आणि रवी राणा यांच्या मुलगा आणि मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय नवनीत राणा यांचे सासू-सासरे म्हणजे रवी राणा यांचे आई-वडील नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत. त्यात आता आमदार रवी राणा यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांचे वडील आणि खासदार नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत राणा कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये आमदार-खासदार पती-पत्नींच्या मुलांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आलं आहे.