प्लाझ्मा थेरेपीचा ना दुष्परिणाम ना फायदा!
6 Aug :- सध्या कोरोनाग्रस्तांवर विविध आजारांच्या औषधांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. मात्र त्यातही प्लाझ्मा थेरेपीदेखील (plasma therapy) आशेचा किरण आहे. प्लाझ्मा थेरेपीचा सकारात्मक परिणाम पाहून महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारनेही प्लाझ्मा थेरेपीचं ट्रायल मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता या थेरेपीचा कोरोना रुग्णांना फारसा फायदा होत नसल्याचं ट्रायलमध्ये दिसून आलं आहे. अशी महत्त्वाची माहिती दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने (AIIMS) दिली आहे.
दिल्लीतील एम्समध्ये कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचं ट्रायल करण्यात आलं. ट्रायलच्या प्राथमिक पडताळणीनुसार रुग्णांचा मृत्यू दर कमी करण्यात फारसा फायदा होत नसल्याचं एम्सच्या डॉक्टरांनी सांगितलं.एएनआयशी बोलताना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, “ट्रायलवेळी एका गटाला कोरोनावरील सर्वसामान्य उपचारासह प्लाझमा थेरेपी देण्यात आली तर दुसऱ्या गटाला सर्वसामान्यपणे जे उपचार दिले जात आहेत ते देण्यात आले. दोन्ही गटातील मृत्यूदर सारखाचा होता. शिवाय प्लाझ्मा थेरेपी घेत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीतही फारशी सुधारणा झाल्याचं दिसून आलेलं नाही”
“प्लाझ्मा थेरेपी कोरोना रुग्णांवर सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे, त्यामुळे रुग्णांना काही दुष्परिणाम होत नाही आहे. मात्र त्याचवेळी त्याचा काही फायदाही होताना दिसत नाही. त्यामुळे आताच निष्कर्ष काढू शकत नाही”, असं डॉ. गुलेरिया म्हणाले.