महाराष्ट्र

मातृशोक बाजूला सारून आरोग्यमंत्री कर्तव्यावर हजर!

6 Aug :- गेल्या काही महिन्यांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाच्या संकटात सरकार आणि मंत्री कामाला लागले आहेत. आरोग्यमंत्री या नात्यानं राजेश टोपेही कोरोनाच्या युद्धात सक्रिय दिसत आहेत. विशेष म्हणजे आईचं निधन झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांनी पुन्हा एकदा कामात स्वतःला झोकून दिलं आहे. अवघ्या तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड येथील कोविड सेंटरला आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी संध्याकाळीच भेट देऊन पाहणी केली. तर बुधवारी मुंबईत आल्यानंतर दैनंदिन बैठका घेऊन कामकाजाला सुरुवात केली. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागात आजही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर 14 दिवसांचे सुतक पाळण्याची प्रथा आहे. आईच्या निधनानंतर 14 दिवसांचा दुखवटा न पाळता या काळात त्यांनी विधी तीन दिवसांत केल्यानं तो चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच जुन्या परंपरा ह्या आताच्या काळाशी सुसंगत असाव्यात समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी बदलाचा पायंडा घालून दिला तर समाजप्रबोधनाला दिशा मिळते, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.

आईने शेवटच्या काळात पाठीवर दोन्ही हात ठेवून आशीर्वाद दिल्याचे सांगतानाच आता ह्याच आशीर्वादाच्या बळावर पुन्हा जोमाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलो असल्याची भावना आरोग्यंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांचे 1 ऑगस्ट रोजी रुग्णालयात उपचार सुरू असताना दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर रविवारी जालना जिल्ह्यातील मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.