कोल्हापुरात पुन्हा पुराचा धोका? पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
कोल्हापूरः दोन दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याची वाटचाल महापूर येण्याच्या दिशेने चालली आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शंभरावर बंधारे पाण्याखाली गेली असून ठिकठिकाणी रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे तीस पेक्षापेक्षा अधिक मार्ग वाहतुकीसाठी बंद पडले आहेत. जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून अनेक ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महिनाभर दडी मारलेला पाऊस दोन दिवस प्रचंड बरसत आहे. मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने बुधवारी देखील आपली हजेरी कायम ठेवली. गेल्यावर्षी पाच ऑगस्टला महापूर आला होता. तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. पंचगंगा नदी प्रथमच पात्राबाहेर पडली असून सायंकाळी पाणी इशारा पातळी ओलांडली. ३९ फुटावर इशारा तर ४३ फुटावर पाणी पाहोचल्यास धोका पातळी आहे. तासाला एक फुट पाणी पातळी वाढत आहे. पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने आंबेवाडी, चिखलीसह अनेक गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे. यामुळे या गावांतून नागरिकांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जयंती नाल्याचे पाणी शहरातील शाहूपुरी भागातील अनेक घरात शिरले आहे. शहरात अनेक सखल भागात पाणी साचले आहे. परीख पुलाखालील मार्ग वाहतूकीसाठी बंद झाला असून बागल चौक कबरस्तानमध्ये पाणी घुसल्याने अंत्यसंस्कारामध्ये अडथळा आला आहे. शहराची वाटचाल महापुराकडे होत आहे. त्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. इचलकरंजी येथील जुन्या पुलावर पाणी आल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. चंदगड तालुक्यातील कोवाड बाजारपेठेत पाणी घुसले आहे. जिल्ह्यातील शंभरावर बंधारे पाण्याखाली गेली असून सर्व धरणे नव्वद टक्केपेक्षा अधिक भरली आहेत. कोल्हापुरातील ऐतिहासिक कळंबा तलाव या हंगामात प्रथमच तुडुंब भरल्याने त्यातील पाणी ओसडूंन वाहत आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कचा इशारा दिला आहे. पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नदी काठच्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय काही गावात स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अनेक रस्त्यावर पाणी आल्याने जिल्ह्यातील प्रमुख तीस मार्ग बंद झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर ते गगनबावडा या प्रमुख मार्गाचा समावेश आहे. हिरण्यकेशी नदीला पूर आल्याने आजरा मार्गे गोवा व कोकणला जाणारा रस्ता बंद झाला आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३१७ मिमि पावसाची नोंद झाली आहे. आणखी दोन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे.