News

व्याजदर कपात, ‘EMI’ स्थगिती ; थोड्याच वेळात ‘RBI’ची घोषणा

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीनदिवसीय बैठक सध्या सुरु आहे. आज गुरुवारी ऑगस्ट व सप्टेंबरसाठीचे पतधोरण रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात येईल. या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे अर्थजगताचे लक्ष लागले आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्याने रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे या पतधोरणात रेपो दरात कपातीचा निर्णय घेतला जाणार नाही, असे मत काही अर्थतज्ज्ञ व बँकर्सनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे रेपो दरात कपात केल्यानंतरही अर्थव्यवस्थेने अपेक्षित वेग धरला नसल्याने बँकेकडून आणखी रेपो दरकपात झाल्यास ते आश्चर्याचे ठरणार नाही, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

करोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी आणि लॉकडाउनचा परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. यापूर्वी पतधोरण आढाव्याची बैठक मार्च आणि मे महिन्यात झाली होती. त्यामध्ये रेपो दरामध्ये एकूण १.१५ टक्क्यांची कपात करण्यात आली. इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांच्या मते आगामी पतधोरण आढाव्याच्या बैठकीनंतर रेपो दरामध्ये ०.२५ टक्क्यांची आणि रिव्हर्स रेपो दरामध्ये ०.३५ टक्क्यांची कपात करण्यात येण्याची शक्यता आहे.

आर्थिक गाडा सुरळीत होण्यासाठी रिझर्व्ह बँकेने यापूर्वी केलेल्या उपाययोजनांचा कितपत लाभ झाला, विविध क्षेत्रांतील सद्यस्थिती, त्यांच्या गरजा आदी मुद्द्यांचा या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर दोन महिन्यांचे पतधोरण निश्चित केले जाणार आहे. स्टेट बँकेतर्फे वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या इकोरॅप या संशोधन अहवालात संभाव्य दरकपातीची शक्यता फेटाळून लावली आहे.

‘रिझर्व्ह बँकेने रेपो दरात यापूर्वीच १.१५ टक्क्यांची (११५ बेसिस पॉइंट्स) कपात केली आहे. नवीन कर्जांवरील व्याजदरात ७२ पॉइंट्सची कपात करून अनेक बँकांनी या दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवला आहे. काही मोठ्या बँकांनी तर कर्जांवरील व्याजदरात ८५ पॉइंट्सची कपात केली आहे. त्यामुळे नवीन पतधोरणात आणखी दरकपात होईल, याची शक्यता नाही,’ असे इकोरॅपमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेने आणखी पाव टक्क्यांची दरकपात करणे आवश्यक आहे, असे मत काही बँकर्सनी व्यक्त केले आहे.

कर्ज वसुलीला स्थगिती (EMI Moratorium) मिळणार की सवलत बंद होणार
करोना विषाणूचे संक्रमण झेलणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक आगामी पतधोरण आढाव्यात रेपो दरात आणखी पाव टक्क्यांची कपात करण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारपासून पतधोरण समितीची बैठक सुरु असून आज व्याजदरासंदर्भात घोषणा होणार आहे. रिझर्व्ह बँकेने कर्जांच्या (

RBI) हप्तेस्थगितीला किंवा कर्जहप्ते लांबणीवर टाकण्याला (EMI Moratorium)आणखी मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी बँकिंग क्षेत्रातून होत आहे. या सुविधेचा गैरफायदा कर्जाचे हप्ते फेडू शकणारे लोक उठवत आहेत, ज्यामुळे वित्त क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे, असे बँकर्सचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत बँक पतधोरण समिती काय निर्णय घेते ते पहावे लागणार आहे.