भारत

‘त्या’ दोघांमुळेच राममंदिर भूमिपूजन -लता मंगेशकर

5 Aug :- देशाच्या राजकारणात गेली अनेक वर्ष रखडलेला वाद संपून अखेर राम मंदिराचे भूमिपूजन झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झाले.देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आहेत त्या ठिकाणांहून राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पाहावा असे आवाहन भाजपकडून करण्यात आले होते.सर्व नागरिकांनी घरबसल्या राम मंदिर भूमोपूजनाचा मनसोक्त आनंद घेतला.अयोध्येत राममंदिर हे कित्येक वर्षांचं स्वप्नं आज प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राममंदिराचा भूमिपूजन सोहळा झाला. देशातील प्रत्येकाला याचा आनंद होतो आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांनीदेखील याबाबत आनंद व्यक्त केला आहे.अयोध्येतील राममंदिराचं श्रेय लतादीदींनी दोन नेत्यांना दिलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळे कित्येक वर्षांचं स्वप्नं साकार होत असल्याचं लतादीदी म्हणाल्यात. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

लता मंगेशकर ट्वीटमध्ये म्हणाल्या, “कित्येक राज्यकर्ते, कित्येक पिढ्या आणि अखिल विश्वातील रामभक्ताचं स्वप्नं आज साकार होताना दिसत आहे. कित्येक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं पुननिर्माण होत आहे, कोनशिला बसवली जाते आहे. याचं सर्वाधिक श्रेय माननीय लालकृष्ण अडवाणींना जातं कारण त्यांंनी या मुद्द्यावर रथयात्रा काढून संपूर्ण देशभरात जनजागृती केली होती. तसंच माननील बाळासाहेब ठाकरेंना याचं श्रेय जातं आहे”

“कोरोनामुळे आज भलेही लाखो रामभक्त अयोध्येत जाऊ शकले नाही मात्र त्यांचं मन आणि ध्यान श्रीरामांच्या चरणीच असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा सोहळा झाला, याचाही आनंद मला आहे. आज मी, माझं कुटुंब आणि संपूर्ण जग खूप आनंदात आहे आणि आज प्रत्येक हृदय, प्रत्येक श्वास जय श्रीराम बोलतो आहे, असंच वाटतं आहे”, असं लता मंगेशकर म्हणाल्या.