मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले जनतेला महत्वपूर्ण आवाहन
5 Aug :- राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे मुंबईसह उपनगरात वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई व परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या. यावेळी नागरिकांनी अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईत अवघ्या 5 तासात 300 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली. मुंबईतील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यादरम्यान केले. ‘कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.